मी एक मध्यमवर्गीय, 'वाडा' संस्कृतीत वाढलेला, नोकरी करून संसारात रमणारा साधा मनुष्य. पण जाणिवा जागृत असलेला. नोकरीतसुद्धा कामाचं स्वरूप टॆक्निकल होतं. १९६९ सालापर्यंत 'कूपर' कंपनीमध्ये नोकरी केली. नंतर 'थिसेन्स क्रुप'मध्ये नोकरी केली.
      घरात रिन्युएशन चालू असताना खालच्या खोलीत झोपाळा लावायचे ठरले. त्या झोपाळ्याला पितळी फुलं हवी होती म्हणून शोधाशोध सुरू केली. तेव्हा एका पितळी वस्तूंच्या दुकानात ती फुलं मिळाली आणि तिथेच मोडीत घातलेली भातुकलीतील पितळेची छोटी भांडीही दिसली आणि त्या भांड्यांनी हृदयाचा ठाव घेतला.
      ती छोटी छोटी भांडी मी त्या पितळी फुलांबरोबर विकत घेतली. सुरुवातीला घरातील सर्वांनी "हे काय? ही कशाला आणली?" "ह्याचा काय उपयोग?" वगैरे बोल लावले. पण ती छोटी छोटी भांडी चिंचेने छान धुवून लख्ख केली. आता ती भांडी पिवळी धमक दिसू लागली आणि त्यांना घरातील शोकेसमध्ये जागा मिळाली. आणि दर सुट्टीच्या दिवशी अशा छोट्या भांड्यांना शोधण्याचा छंदच जडला.

      जुन्या भांड्यांची दुकानं पालथी घालू लागलो. मिळतील ती भातुकलीची भांडी खरेदी करू लागलो. पगारातील काही रक्कम बाजूला ठेवायचो आणि भांड्यांची खरेदी करायचो. त्या भांड्यांचे जणू वेडच लागले. हळूहळू भातुकलीच्या भांड्यांची संख्या वाढू लागली.
      हे माझे वेड माझ्या मित्रांना माहीत झाले होते. त्यामुळे कोणी कुठे बाहेरच्या राज्यात, गावाला गेले आणि कुठे अशी वेगळी भांडी दिसली तर माझ्यासाठी ती आवर्जून आणत.
     त्यातलेच एक मित्र म्हणजे डॉ. जोशी. डॉक्टरांनी माझ्यासाठी आठवणीनी जैसलमेरहून ’पाण्याचा हापसा’ आणि हिमाचलप्रदेशातून ’पोस्टाची पेटी’ आणली. दोन वेगळ्या भांड्यांची भर पडली. हळूहळू ह्या भांड्यांची संख्या इतकी वाढली की शोकेसमधून ही भांडी पिशवीत, पिशवीमधून पेटीत जाऊन बसली. आणि मग भांड्यांची संख्या इतकी वाढली की या भांड्यांचे प्रदर्शन भरवावे अशी कल्पना सुचली आणि १६८ भांड्यांचे पहिले प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरले.
     सुरुवात तर छानच झाली. कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांचेही प्रोत्साहन मिळाले. भातुकलीच्या भांड्यांमधे इतका रमलो की शेवटी लवकर रिटायरमेंट घेऊन पूर्णवेळ भातुकलीची भांडी जमवणे, व बनवणे व कालबाह्य झालेल्या भांड्यांचा इतिहास शोधणे, त्या भांड्यांची प्रदर्शने करणे, जुन्या भांड्यांची माहिती देणे यातच रममाण झालो.
      जात्यावर दळणारी बाई, स्वयंपाक करणारी बाई असे प्रथम शाडूचे स्थिर पुतळे होते. पण आता काही खेळणी मोटार लावून हालती केली आहेत. घुंगराच्या तालावर खालीवर होणारा अडकित्ता, छोट्या दोरीनी रवी घुसळली जाते. पाट्या-वरवंट्यावर चटणी वाटली जाते. लहान मुलांना खरीखुरी चकली पाडता येईल असा छोटासा सो-या आहे. खराखरा पेटवता येईल असा स्टोव्ह आहे. पाणी गरम करणारा बंब आहे. दूधदुभत्याचं जाळीचं दार असलेलं कपाट आहे.
     भातुकलीची ही भांडी तांबे, पितळ, दगड, माती, लाकूड, लोखंड इत्यादीपासून बनवलेली आहेत. फुंकणी, कोळशाची इस्त्री, शकुंतला भांडे, उखळ, मुसळ, घागरी, गडवे, तपेली, कढई, लाकडी ठकी, फिरकीचं झाकण असलेला तांब्या, पुडीचा डबा, मोदक पात्र, झारी इत्यादी अनेक प्रकारची भांडी. चांदीची भातुकली पण आहे. यात चंदनी लाकडाचे पाट, त्याला सोन्याची फुलं. ह्या भातुकलीने असे राजेशाही रूप घेतले आहे.