आजीची भातुकली, पुणे
भातुकली
पुढील प्रदर्शन
तारीख :
वेळ :
पत्ता :
मागील प्रदर्शन
तारीख : १८ ते २० जानेवारी २०१९
वेळ : सकाळी ९ ते रात्री १०
पत्ता : लाल चौकी फडके मैदानाजवळ कल्याण - (प)
मागील इतर प्रदर्शने
विशेष माहिती
भातुकलीचे प्रदर्शन डोहाळेजेवण, बारसं, वाढदिवस, मुंज, वास्तुशांती अशा समारंभात आपण आयोजित करू शकता .
संग्रहक

श्री.विलास नारायण करंदीकर

मुख्य पान भातुकली वैशिष्ठ्यपूर्ण भांडी अभिप्राय छायाचित्रे संपर्क
Welcome
छापील प्रत

     मी एक मध्यमवर्गीय, 'वाडा' संस्कृतीत वाढलेला, नोकरी करून संसारात रमणारा साधा मनुष्य. पण जाणिवा जागृत असलेला. नोकरीतसुद्धा कामाचं स्वरूप टॆक्निकल होतं. १९६९ सालापर्यंत 'कूपर' कंपनीमध्ये नोकरी केली. नंतर 'थिसेन्स क्रुप'मध्ये नोकरी केली.
      घरात रिन्युएशन चालू असताना खालच्या खोलीत झोपाळा लावायचे ठरले. त्या झोपाळ्याला पितळी फुलं हवी होती म्हणून शोधाशोध सुरू केली. तेव्हा एका पितळी वस्तूंच्या दुकानात ती फुलं मिळाली आणि तिथेच मोडीत घातलेली भातुकलीतील पितळेची छोटी भांडीही दिसली आणि त्या भांड्यांनी हृदयाचा ठाव घेतला.
      ती छोटी छोटी भांडी मी त्या पितळी फुलांबरोबर विकत घेतली. सुरुवातीला घरातील सर्वांनी "हे काय? ही कशाला आणली?" "ह्याचा काय उपयोग?" वगैरे बोल लावले. पण ती छोटी छोटी भांडी चिंचेने छान धुवून लख्ख केली. आता ती भांडी पिवळी धमक दिसू लागली आणि त्यांना घरातील शोकेसमध्ये जागा मिळाली. आणि दर सुट्टीच्या दिवशी अशा छोट्या भांड्यांना शोधण्याचा छंदच जडला.

      जुन्या भांड्यांची दुकानं पालथी घालू लागलो. मिळतील ती भातुकलीची भांडी खरेदी करू लागलो. पगारातील काही रक्कम बाजूला ठेवायचो आणि भांड्यांची खरेदी करायचो. त्या भांड्यांचे जणू वेडच लागले. हळूहळू भातुकलीच्या भांड्यांची संख्या वाढू लागली.
      हे माझे वेड माझ्या मित्रांना माहीत झाले होते. त्यामुळे कोणी कुठे बाहेरच्या राज्यात, गावाला गेले आणि कुठे अशी वेगळी भांडी दिसली तर माझ्यासाठी ती आवर्जून आणत.
     त्यातलेच एक मित्र म्हणजे डॉ. जोशी. डॉक्टरांनी माझ्यासाठी आठवणीनी जैसलमेरहून ’पाण्याचा हापसा’ आणि हिमाचलप्रदेशातून ’पोस्टाची पेटी’ आणली. दोन वेगळ्या भांड्यांची भर पडली. हळूहळू ह्या भांड्यांची संख्या इतकी वाढली की शोकेसमधून ही भांडी पिशवीत, पिशवीमधून पेटीत जाऊन बसली. आणि मग भांड्यांची संख्या इतकी वाढली की या भांड्यांचे प्रदर्शन भरवावे अशी कल्पना सुचली आणि १६८ भांड्यांचे पहिले प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरले.
     सुरुवात तर छानच झाली. कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांचेही प्रोत्साहन मिळाले. भातुकलीच्या भांड्यांमधे इतका रमलो की शेवटी लवकर रिटायरमेंट घेऊन पूर्णवेळ भातुकलीची भांडी जमवणे, व बनवणे व कालबाह्य झालेल्या भांड्यांचा इतिहास शोधणे, त्या भांड्यांची प्रदर्शने करणे, जुन्या भांड्यांची माहिती देणे यातच रममाण झालो.
      जात्यावर दळणारी बाई, स्वयंपाक करणारी बाई असे प्रथम शाडूचे स्थिर पुतळे होते. पण आता काही खेळणी मोटार लावून हालती केली आहेत. घुंगराच्या तालावर खालीवर होणारा अडकित्ता, छोट्या दोरीनी रवी घुसळली जाते. पाट्या-वरवंट्यावर चटणी वाटली जाते. लहान मुलांना खरीखुरी चकली पाडता येईल असा छोटासा सो-या आहे. खराखरा पेटवता येईल असा स्टोव्ह आहे. पाणी गरम करणारा बंब आहे. दूधदुभत्याचं जाळीचं दार असलेलं कपाट आहे.
     भातुकलीची ही भांडी तांबे, पितळ, दगड, माती, लाकूड, लोखंड इत्यादीपासून बनवलेली आहेत. फुंकणी, कोळशाची इस्त्री, शकुंतला भांडे, उखळ, मुसळ, घागरी, गडवे, तपेली, कढई, लाकडी ठकी, फिरकीचं झाकण असलेला तांब्या, पुडीचा डबा, मोदक पात्र, झारी इत्यादी अनेक प्रकारची भांडी. चांदीची भातुकली पण आहे. यात चंदनी लाकडाचे पाट, त्याला सोन्याची फुलं. ह्या भातुकलीने असे राजेशाही रूप घेतले आहे.

     आमच्या प्रदर्शनाची सुरुवात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने होते. उद्‌घाटनाला आलेले पाहुणे छोट्या सो-यातून चकली पाडून प्रदर्शनाचे उद्‌घाटन करतात. छोटी मुलं आपल्याला हाताळता येतील अशी छोटी छोटी भांडी पाहून मोहरून जातात. त्यांना हवे ते गवसल्यासारखे वाटते. त्या भांड्याबरोबर त्यांची गट्टीच जमते.
      प्रदर्शन पाहण्यात ती मुले इतकी रंगून जातात की मुलांच्या आयांची लगेच विचारणा सुरू होते की असा सेट विकत मिळेल का? पण याचा व्यवसाय करायला वेळच मिळत नाही आणि तो पिंडही नाही "व्यवसायाचा !"
      संगणकाच्या आणि फ्लॅट संस्कृतीच्या युगात पुन्हा एकदा, आपल्या वाडा संस्कृतीत ही "भातुकली" केव्हा सर्वांना नेऊन ठेवते हे लक्षातही येत नाही. पूर्वीच्या आठवणींनी काहींना गहिवरूनही येते.
     मोठी माणसे जे करतात ते मुलांनाही करावेसे वाटत असते. घरात आई पोळी करायला लागली की, "आई मी पण एक पोळी करू?" "नको मला घाई आहे आत्ता नको" असे संवाद सुरू होतात. आणि मग रडारड, हट्ट, रागावारागवी सुरू होते. त्यापेक्षा मुलांना हाताळता येईल असं पोळपाट-लाटणं मिळालं की मुलं खुश. मुलांना गुंतून राहायला एक साधन मिळतं. मुलांचा वेळ मजेत जातो.
      आता "भातुकलीच्या" भांड्यांच्या जोडीने जुन्याकाळातील खेळ मांडण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, गंजीफा, बिट्‌ट्या, काडेपेटीचा फोन, काचापाणी, सारीपाट, सागरगोटे, चकारी, विटि-दांडू इत्यादी. प्रदर्शन पहायला आलेल्या महिला सागरगोटे, बिट्‌ट्या पाहून चक्क एक पाय पसरून खाली बसायला तयार होतात आणि पूर्वीसारखा सागरगोट्यांचा डाव मांडतात. माहेरपणाला आल्याचा अनुभव जणू त्या घेत असतात.

      त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून पावते. विटि-दांडू, लगोरी हे खेळ आता कुठे बघायला मिळत नाहीत. नातवंडांबरोबर आलेल्या आजोबांना, मुलांबरोबर आलेल्या बाबांना हे जुने खेळ पाहून लहानपणीच्या विश्वात पुन्हा एकदा फेरफटका मारायला मिळतो.

      घराघरात भातुकलीचा हा खेळ जाऊन पोहोचला पाहिजे असे वाटते. शाळांमधून या "भातुकलीनी" हजेरी लावली पाहिजे.

     पूर्वी मोठाले वाडे होते. त्यात १०-१२ बि-हाडं एकोप्याने राहात असत. मुलं एकत्र येऊन खेळत असत. भांडाभांडी होत असे पण भांडण विसरून परत एकत्र येऊन खेळण्याचा संस्कार तिथे होत होता.

 व्हॉलेंटियर्स पाहिजेत

Home  |  Contact Us  |  Sitemap  |  Disclaimer  |  Mail  |  Login     
2010 - 19, All rights reserved, आजीची भातुकली, पुणे, Pune, India.
Maintained by Infotools® , Pune   |   *Last updated on : 2015-10-25   |   Add this Website to favorites !